सांताक्रूज,
एप्रिल १९९४
आकाशात उंच उंच मारायचीय भरारी
पण अचानक कुणीस म्हंटलं - थांब तरी.
तशी एकदाच तू थांबलीस
अन् नित्य नवी अडकलीस.
पण मग जाणवलं, जशीच तू थांबलीस
पंखांमधली उडायची, तू शक्तीच घालवलीस.
आता त्या पंखांना
उडतात हेच कळेना,
कित्ती कित्ती उंच दाखवलं
तरी उडताच येईना.
कोणी थांबवलं गं तुला? कां म्हणून थांबवलं?
कि नव्हतेच तुला पंख कधी, नुसतेच तुला वाटलं?
पण पंखाविना उडू नये असं का कुणी म्हणतय / कुठे असतय?
अन् जमीन आहे नं चालायला, कोण तुला अडवतय?
पंखांनी तर सारेच उडतात तू पंखांविना मार भरारी,
हे नाही, ते नाही तर सारेच करतात, तू आहे त्यातच शोध काही तरी.
काही तरी नक्की सापडेल
तुझी निराशा होणार नाही.
ईश्वरावर ठेव भरवसा, सापडल्याविना राहणार नाही.
काय हवय गं तुला सापडून, भिरभिरत कां राहतेस?
काही तरी अनुभवायचय ‘खरं’, मला कुठे तरी विसावयचय.
खरं काही सापडायला
लागतात का पंख?
तुझ्यातच तर आहे ग ‘ते’ शोध ना तुझे अंतरंग.
बाहेर काही आहेच नाही,
अन् कुणी कुणाला अडवत नाही,
ज्याचं त्याला मिळाल्याविना क्षणच पुढे सरकत नाही.
आंत काय नि बाहेर काय? तुझं काय नि माझं काय?
सारे परम पित्याचेच आहे, नव्हे, सर्व काही तोच आहे.
खरं म्हणजे हेच तर बघायचय
अन् हेच तर अनुभवायचय,
मग ह्या साठी का हवेत पंख? नव्हे ग
सखे,
आता कारणं शोधणं थांबवायचय !
आता कारणं शोधणं थांबवायचय !
** ** **
No comments:
Post a Comment