Tuesday, 9 June 2020

मनलागो यार फकीरी में...



मन लागो मेरा यार फकीरी में, जो सुख पयो राम भजन में वो सुख नाही अमीरी में।

हाथ में तुंबा बगल में सोटा, चारो दिशा जागीरी में

प्रेम नगर में रहनी हमारी, भलि बन आयी सबूरी में..

आखिर यह तन खाक मिलेगा, क्यों फिरे मगरूरी में?

कहे कबीर सुनो भाई साधो, साहिब मिले सबूरी में..

भला बुरा सबका सुन लीजे, कर गुजरान गरीबी में....



या भजनात कबीर महाराजांनी त्यांचे मन  फकीरीतच लागलय असे म्हंटले आहे.
हे भजन आपण समजायचा प्रयत्न करूया. त्यातील फकीरी हा शब्द पुष्कळ काही सांगून जातो.  
 बाबाजींनी फकीरी म्हणजे नेमकं काय हे समजविण्यासाठी सांगितलेली गोष्ट ... एक राजकन्या असते. तिचं लग्नाचं वय होतं तसं राजा तिला विचारतो कि तुझ्या मनांत आपला पति कसा असावा या संबंधी काही विषेश असेल तर सांग, त्यावर ती राजाला सांगते की तिला राजकुमाराशी लग्न करायचे नाही तर एखाद्या फकीराशी लग्न करायचे आहे. राजाला अगोदर तर खूप आश्चर्य वाटतं व तिला समजवायचा प्रयत्न पण करतो,पण ती तिच्या मनांत निग्रही असते अन्  तसेच राजाला सांगते की हा तिचा  निर्णय पक्काआहे. 
मग काय सर्व दूर फकीरांची शोधाशोध सुरू होते. करता करता राजकन्येला जमेल असा एक फकीर सापडतो. सर्व प्रकारे त्याची चौकशी होते अन्  त्याला आणलं जातं. आणि त्याच्याशी राजकन्येचा विवाह संपन्न होतो. मग राजकन्या आणि तो फकीर त्याच्या घरी जातात. घर काय एक लहानशी झोपडी असते, सामान काहीच नसते, घरी पोचल्यावर तो राजकन्येला एका दरीवर बसवतो व थोडीशी भाकरी असते त्यातच दोघे मिळून जेवतात. राजकन्या झोपडीत नजर फिरवते, सामान काहीच नसतं. तिला फकीरच हवा होता व याच्या कडे सामान नाही हे बघून ती आनन्दी पण होते. तेव्हढ्यात तिला भिंतीवर एक पुर्चुंडी टांगलेली दिसते. ते काय आहे म्हणून ती फकीराला विचारते. तो म्हणतो ते आपले रात्रीचे जेवण आहे. या वर ती एकदम फकीराला म्हणते की अरे, ज्या अल्लानी आपल्याला सकाळचं जेवण दिलं तो रात्रीचं देईल असे नाही वाटले तुम्हाला? आणि तिला एकदम लक्षात येते, की आपला नवरा खरा फकीर नाहीए. ज्याला अल्लावर पूर्ण भरवसा नाही, तो कसला फकीर !
या गोष्टीचा आधार घेत आम्हाला नंतर बाबाजींनी, फकीर आणि त्याची फकीरी, म्हणजे नेमके काय हे समजावले. bv

फकीरी.. ह्या शब्दाचा dictionary  प्रमाणे अर्थ असतो... गरीबी, poverty, निर्धन अवस्था. सूफी , किंवा वाळवंटांत फिरणारे, अल्लाशी अत्यंत प्रेम व भरवसा असणारे असे लोक फकीर म्हणवत. पण पुढे फकीरी हा शब्द अश्या सर्वच लोकांसाठी वापरला जाऊ लागला जे ईश्वरावर पूर्णपणे सगळं सोडून जगतात, वागत असतात. परम भक्ताची अवस्था कशी असेल तसे,  म्हणजे जे द्यायचे असेल ते तो देईल नाही मिळालं तर तीच त्याची इच्छा आहे असे अगदी पूर्ण पणे समर्पण भावाने स्वीकार केलेलं असतं. काहीही आवड निवड नसते, अमुक काही हवे अथवा नको असे नसते, म्हणजे सगळेच ईश्वरावर सोडलेले, अल्लाह वर सोडलेले असा जो असतो तो फकीर. आणि ती अवस्था म्हणजे फकीरी. ही परम भक्तीची, परम ज्ञानाची अवस्था जाणली जाते

फकीर हा परम ज्ञानीभक्त असतो.

मीरा बाई चे एक भजन खूप प्रसिद्ध आहेकरना फकीरी फिर क्या दिलगीरीकोई दिन लाडू न कोई दिन पेडाकोई दिन फाकम फाका जी, कोई दिन घोडा न कोई दिन गाडी कोई दिन पैदल चलना जी…सबंद गाणंच ती अवस्था वर्णन करणारं आहे. मीराबाईने त्या अवस्थेतच ते भजन गायलं आहे.  
सर्व काही म्हणजे  अगदी आता मला जेवायला मिळालं ना, झालं, मग पुढचं तो परमेश्वर, अल्लाह जो पण मानला जातो तो देईल, ह्या धरणेने सतत जगणारा तो फकीर. जेही इश्वराला द्यायचे असेल ते तो देईल हीच धारणा नाही मिळालं तर ही पण त्याचीच इच्छा , कृपा जे सएल ते, बाबाजी म्हणायचे ..जो है जैसा है भगवतीकी इच्चा है। तिथे मग, मागणे, तुझी कृपा असूदे इ. . काही नसते

हा शब्द  सूफी संतांसाठी जास्त वापरला गेला. म्हणून कबीर महाराज म्हणतात की मन लागो मेरो यार फकीरी में,  आता मला आहे त्या पेक्षा अजून काही तरी पाहिजे असले तर मी धडपडते आणि धन कमावते, अमीरीअधिक पैसा याकडे धडपड करून जाणे होते. म्हणजे तृप्तिचा भाव नसतो, समाजात व्यवहारात योग्य पण धरलं जातं. पण जे काही मिळायचे असेल ते परमेश्वराच्या इच्छेनुसार मिळेल ही एकदा दृढ धारणा झाली तर मग काही तरी मिळवायची धडपडच नाही, आणि मग जो देणारा आहे त्याचे नाम किंवा त्याची कीर्ती गाण्या शिवाय काम तरी काय उरते?

दुसरी ओळ आहे..(जो सुख पायो राम भजन में वो सुख नाही अमीरी में…आता इथे ते म्हणतात की रामाचे भजन करण्यात मला जे सुख मिळतं तसे सुख मला अमीरीत, श्रीमंतीत नाही मिळत. पैश्या ने इतर सर्व सुखं विकत घेता येतात पण आंतरिक सुख, समाधानाचे सुख,  सदैव तृप्तीची भावना, सर्व काही आहे, कशाचीच आस  नाहीए हा भाव, हे सगळं असायला पैसे पुरत नाहीत. कबीर साहेब म्हणतात की हे सगळं  आणि अजून खूप, पुरून उरेल येव्हढं सुख राम भजनात मला मिळतं. 
आता राम भजन, त्याची कीर्ती गाणे हे सगळ म्हणजे नेमकं काय? कबीर महराजांचा राम हा काही फक्त दशरथ कौसल्यापुत्र, किंवा सीता पती, राम नाही. एका ठिकाणी त्यानी रामाचा नेमका अर्थ काय हे सांगितले आहे. ते म्हणतात,
एक राम दशरथ का बेटा, दूजा राम  घट घट में बैठा।
तीजे राम का सकल पसारा, चौथा राम तो सबसे न्यारा।
एक राम हा राम आपल्या परिचयाचा आहे, दशरथ कौसल्या पुत्र राम, लक्ष्मण भरत व शत्रुघ्न यांचा भाऊ व सीते चा पति असा राम. दूजा राम. आता आपण म्हणतो नं की प्रत्येक घटात म्हणजे प्रत्येक प्राण्यांत, वनस्पतीत  राम आहेच आहे. तो दूजा म्हणजे दुसरा राम आहे. तीजा राम.. आता तिसरा राम म्हणजे जे ही काही आपल्याला दिसतय किंवा जाणवतय ते सगळं रामच आहे. नुसतं `त्याच्यात` राम आहे असे नाही तर ते सगळे रामच आहे आणि चौथा राम..कसा आहे, कोण आहे? हे चौथ्या रामा बद्दल आपण समजायचा प्रयत्न करूया.

मला  ह्या रामाचा अनुभव नाही पण जे काही बौद्धिक पातळीवर समजले आहे तेव्हढेच आपण एकमेकांबरोबर बोलू शकतो... Theoreticallyच ..

सगळ्या अस्तित्वात भरून उरलेला जो आहे, अगदी अस्तित्वाच्या अगोदर पासून जे काही नुसतं आहे ते .. आपल्या संत महात्मा लोकांनी असे सांगितले आहे की ही जी काही उत्पत्ती आहे तिच्या अगोदर पासूनच, अनादि काळापासूनच सगळीकडे ब्रह्मन्, काही लोक त्याला परमात्मा म्हणतात तोच खच्चून भरलेला आहे.सर्वत्र, सर्व आयामात अस्तित्व फक्त परमात्म्याचंच आहे, ब्रह्मनच भरून आहे.  ही अवस्था निःस्पन्द अवस्था असते. काही ही हालचाल नाही. फक्त असणं ! अशा  ब्रह्मन् मधे ‘एकोहम् बहुस्याम् ’ हा भाव उठतो. इच्छा उठते की मी एकटा आहे, अनेक व्हायचय ! हे असे त्यातच काही तरी हालचाल सुरू होते, स्पंद सुरू होतं आणि काही तरी manifest होतं आणि त्यातच काही un manifest  राहतं. स्पन्द सुरू होण्याला आपल्या कडील संतांनी म्हंटलय… कि हरी ला किंवा ईश्वराला वाटले… एकोहं बहुस्याम्  आणि मग तो अनेक रूपात व्यक्त झाला. तर ही अशी उत्पत्ती! 

आता उत्पत्ति मधे जे manifest झालं त्याला आपल्या कडे शक्ति म्हटलं आणि जे un manifest होतें त्याला शिव म्हटले आहे.… सायंसच्या भाषेत त्याला Energy and Matterअसे म्हणतात. (which is inter convertible) आणि ह्या सगळ्याच्या अगोदरचं म्हणजे ज्याला ‘ब्रह्म’ * म्हटलय तो कबीरमहाराजांचा ... चौथा, न्यारा राम ! काही ही तिथूनच उद्भवलय त्यात काही ही अजून मिसळलं नाहीए. जे काही आहे ते एकच ब्रह्मन् आहे... ह्राच तो कबीर महाराजांचा न्यारा राम्.  ह्या रामाची सतत जाणीव असणे म्हणजे, फक्त तोच आहे (बाकी सकल पसारा) ..अस जे असणं आहे, त्यांचे सुमिरन, त्यांचे भजन, त्याचे नाम ... आता कबीर महाराजांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते म्हणतात तेच ब्रह्म, त्यांचा राम ...तोच सगळी कडे आहे ..कारण ‘आहे’ म्हणजे ‘असणं ’ फक्त रामाचंच आहे. अजून  काही हायेज नाही.

वही राम दशरथ का बेटा वही राम घट घट में बैठा।
इसी राम का सकल पसारा,  वही राम दुनिया से न्यारा॥

ह्या समग्र उमजण्यातून ,  अवस्थेतून हे शब्द आलेत....जो सुख पायो राम भजन में, वो सुख नाही अमीरी में। आता या वस्तुस्थितीची अविरत जाणीव , निःसंशय उमज व जे उमजलय त्याची धारणा असून जे  मुखातून , मनांतून , करण्यातून या अस्तित्वाबद्दल किंवा कसं ही बाहेर येतं तेच भजन.  भजन म्हणजे काही नुसतं हातात टाळ घेऊन आर्ततेने गाणंच पाहिजे असे नाही. 
कबीर महाराज रात्रंदिवस याच भजनात मग्न होते. जीवन जगत होते, जे आवश्यक आहे ते काम करत होते, कापड विणत होते...आणि ते करताना त्यांचे चित्तात एकच होतं...तेच त्यांचे रामाचे भजन  होते, तेच सुमिरन होते.
 *(हे निःस्पन्द अवस्थे बद्दल तुम्हाला कोणाला अजून विज्ञानाच्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर JK आणि Devid Bohm यांच्या संवादा वरून समजेल you tube आहे.)

तर आपण  नाम भजन किंवा रामभजन मधील सुख काय असते ते समजून घेतले.

हाथ में तुंबा बगल में सोटा, चारो दिशा जागीरी में.... फकीर काही घर करून राहात नसे, एकटे फिरत असताना  पाणी पिण्या साठी  तुंबा लागत असावा, कारण जंगलातून किंवा गावा बाहेर फिरत असताना ओढ्यातून अथवा नदीतून पाणी घेण्या साठी तुंबा लागत असावा, कोणी जेवण दिले तर स्वतः चे पात्र असावे म्हणून पण असेल. तसेच सोटा हा अंधारात चालताना जमीनीवर चाचपडण्या साठी (रात्री अंधारात आश्रमात बाहेर जाताना एखादी काठी हातात असावी असे बाबाजी पण नेहमी सांगत असत.) आणि चारो दिशा जागीरी में त्या फकीराचे  ‘हे माझं घर’ असे म्हणून काहीच नसतं, चारी दिशा आपल्याच आहेत, कुठे भिंती नाहीत की …इथपर्यंत माझं घर, ह्या पुढे दुसर्‍याचं, असा भावच नाही न? सगळी माझीच जागीर आहे. हे माझं अन् हे माझं नाही असं काही वाटायचा संबंधच नाही . कबीर महाराज म्हणतात ....

प्रेम नगर में रहनी हमारी, भलि बन आयी सबूरी में आता अगोदर समजल्या प्रमाणे जर मला सगळीकडे त्या न्यार्‍या रामाचेच ‘असणे’ जाणवतेय तर मी प्रेम नगरीतच आहे न? दुसरा काही भाव मनांत असेल का?..माझं तुझं, चांगलं वाईट, सुख दुःख…सर्वत्र एकच राम भरला आहे तर प्रेमा शिवाय दुसरं काय असू शकतं? मी निवांतच असते न? मग काही तरी होईल कि नाही, कसं होईल हे असले विचार पण येणार नाहीत न? मग सबूरीत पण सगळं मस्तच आहे जाणवेल.  कारण काय घडणार ते ईश्वरेच्छेने जेव्हा घडायचे तेव्हा घडेल, आपण निर्धास्त..निवांत ! सबूरीतच निवांत राहणे होते.
 
आखिर यह तन खाक मिलेगा, क्यों फिरे मगरूरी में?
शेवटी हे शरीर सुटणार आहे, खाक मिलेगा म्हणजे राखच होणार आहे न,  धुळीला मिळणार आहे. मग आपण कशाची येव्हढी मगरूरी करतो? या सगळे संत आपल्याला सांगतात की आपण आपल्या शरीराशी फार मोह ठेवून असतो, आसक्ति ठेवतो. त्याचाच अहंकार असतो. सगळी नाती गोती पण या देहाचीच असतात. पण कधीतरी हे शरीरच जर सुटणार आहे मग त्याच्याशी येव्हढा लोभ मोह ठेवण्या पेक्षा जे नित्य आहे त्याचा आपण कां विचार करत नाही? कुठल्या मगरूरीत वावरतोय आपण? समोरच्याशी निरहंकार पणे कां वागता येत नाही? सतत माझंच खरं हे सांगायची धडपड का? ही मगरूरी का?
 शेवटी कबीर महाराज् म्हणतात..

कहे कबीर सुनो भाई साधो, साहिब मिले सबूरी में..
कबीर साहेब म्हणतात… (साधो म्हणजे.. जे लोक या मार्गावर चालायला लागले आहेत ते) कि  जिवात सबूरी धारण करता आली तरच ईश्वराच लाभ होऊ शकेल. सबूरी नाही म्हणजेच मला घाई आहे, सतत बेचैनी आहे, हे हवं ते हवं, असं आहे, मी काही तरी केलं तरच मिळेल हा भाव आहे. पण जर  जे आहे ज्तसं आहे ते सारे फक्त ईश्वरच आहे, आणि फक्त तोच जर आहे तर हे माझं मन कां बरं मधे मधे घाई करतय? त्याला आपलेच घोडे पुढे कां दामटायचे आहे? हीच तर मगरूरी नाही? कां माझ्याच मना प्रमाणे गोष्टी घडाव्या असा आग्रह होतोय? तर कबीर महाराज म्हणतात… साहिब मिले सबूरी मे..   कबीर महाराज म्हणतात की साहिब म्हणजे परमेश्वर तर तुझ्या जिवात स्वस्थ पणा आला, सबूरी आली तरच मिळेल. कारण जो पर्यंत “मनात पूर्ण विश्वास, श्रद्धा, खात्री आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ही उमज की जे काही आहे ते फक्त परमेश्वरच आहे,  अन्य काही ही नाही, एक ब्रह्मन् च आहे, माझा रामच आहे ही धारण दृढ होत नाही, तो पर्यंत माझं काहीतरी म्हणणं राहतंच राहतं.  आणि जिवात सबूरी येत नाही. 
पण ते तर म्हणतात की साहब मिले सबूरी में..

भला बुरा सबका सुन लीजे, कर गुजरान गरीबी में....
ते म्हणतात कि कोणी तुम्हाला चांगलं म्हणेल, कोणी वाईट म्हणेल... तुमचा अपमान करेल ...कोणी खूप तारीफ करेल, तर तुम्हाला कोणी ही काही ही म्हंटलं तरी ... सगळं ऐकून घ्या जसंच्या तसं..तारीफ ऐकून उगाच उंडारू नका अन् अपमान केला म्हणून दुःखी होऊ नका. कारण तुम्हाला आता उमजलय की जे आहे ते  केवळ एक राम अअहे, ब्रह्म्न् आहे, मग कोणी काही का बोलेना?  सगळं ऐकून घ्या पण त्या मुळे तुमचं मन दुखवू नका, तसेच उगाच जास्तीचे सूख मिळाले असे वाटवून घेऊ नका. . पण त्या पलीकडील परमेश्वरात रमा .

कर गुजरान गरीबी में.. गरीबी म्हणजे …तुम्ही जणू कोणीच नाही…पूर्ण पणे egoless.… बिना मगरूरीच्या रहा..ाजिबात अहंकार विरहित अशा त्या अवस्थेला गरीबी म्हंटलय. आपण एखादी मुलगी सगळ्यांचं ऐकून घेणारी असेल तरी म्हणतो न की ती खूप गरीब आहे.. त्या गरीबी बद्दल म्हणत आहे. (व्यवहारात हा दुर्गुण धरला जातो पण ईश्वरासमोर हा अत्यंत विषेश गुण आहे.) काय झालं कोणी वाईट अथवा चांगलं म्हंटलं तर? तुमच्यातल्या मी लाच फक्त चांगलं/वाईट वाटतय. त्याचीच मगरूरी आहे. खरे अस्तित्व तर फक्त रामाचे आहे न? या मी ला किती महत्व देणार आहांत? जो नाहीच आहे त्या मी ला काही वाटलं म्हणून उगाच दुःखी अथवा सुखी होण्यात काय अर्थ आहे.  अस आपण समजावं व वागावं असं कबीर महाराज म्हणत आहेत. 

बाबाजींनी सांगितलेली कबीर आणि गोरख नाथांची गोष्ट,  कबीर साहेबांकडे जेव्हढी गरीबी आहे तेव्हढी या सकल ब्रह्माण्डात कोठेच नाही. म्हणुन ते म्हणताता की....भला बुरा सबका सुन लीजे, कर गुजरान गरीबी में....
मन लागो मेरा यार फकीरी में, जो सुख पयो राम भजन में वो सुख नाही अमीरी में।

शिव्ॐ.